संचारबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे

पुणे – राज्यातील महानगरांमध्ये राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्‍यक सेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी वगळता अन्य कोणालाही या संचारबंदीच्या काळात सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे पोलिसांनी शहरात जमाव बंदी लागू केली आहे. तसेच संचारबंदीचे आदेशही काढले आहेत. दरम्यान ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त रात्री घराबाहेर न पडण्याचे आणि सण व नववर्ष घरातच साजरे करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. शहरात रात्री 11 ते 6 कडक संचारबंदी लागू असेल. विनाकारण त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा नवा विषाणूचा संसर्ग आल्यावर राज्यातील महापालिका क्षेत्रात आजपासून संचारबंदी लागू झाली आहे. यामध्ये अत्यावश्‍यक सेवांना वगळले गेले आहे. लॉकडाऊनच्या काळातील असणारे नियम व सवलती या काळात लागू असतील. पोलीस, डॉक्‍टर, अत्यावश्‍यक सेवांतील कर्मचारी, रुग्ण आदींना संचारबंदीत सवलत असेल. हॉटेल रात्री साडेदहा वाजता बंद करण्याचेही नियोजन केले जाणार आहे. नागरिकांनी आपली कामे त्या हिशोबाने आटपून 11 पुर्वी घरी पोहोचावे. संचारबंदीच्या नियामांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सक्त मनाई : 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील मुले यांना अत्यावश्‍यक सेवेशिवाय बाहेर पडण्यास मनाई.

यांना वगळणार : जीवनावश्‍यक वस्तू व अत्यावश्‍यक सेवा पुरविणारे. पोलीस अधिकारी, पालिकेचे करोना नियंत्रण कर्मचारी, शिफ्टमध्ये काम करणाऱ्या अस्थापनामधील कर्मचारी, वर्तमानपत्राची वाहने, वितरण कर्मचारी, विमान आणि रेल्वेचे आगाऊ बुकिंग केलेले प्रवासी, यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे नववर्षानिमित्त हॉटेल व इतर ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर बंदी असणार आहे. नागरिकांनी करोनाचा उद्रेक लक्षात घेऊन नववर्ष घरीच साजरे करण्यास प्राधान्य द्यावे
– रवींद्र शिसवे सह पोलीस आयुक्त 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.