पेठ – पेठ तालुका आंबेगाव येथे ग्रामपंचायतीच्या तसेच मंचर पोलिसांच्या वतीने करोना विषाणू चा पादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मंचर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मास्क न लावणे, सोशल डिस्टंन्स न पाळणे आणि सार्वजनिक ठिकाणे थुंकणाऱ्यांवर कारवाईसाठी पथकांची नेमणूक केली आहे. या पथकाद्वारे आज (दि. ११) पेठ येथे मास्क न लावणे, सोशल डिस्टंन्स न पाळणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील फळ व भाजी विक्रेते, व्यवसायीक आस्थापना यांनी मास्क व हॅन्डग्लोजचा सक्तीने वापर करणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी तोंडावर कायम मास्क किंवा रुमाल वापरणे, सोशल डिस्टन्सींग पाळणे, सार्वजनीक ठिकाणी न थुंकणे या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
या नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांना नागरीक, भाजी विक्रेते, दुकानदार, फळ विक्रेते यांच्यावर येथून पुढे दंडात्मक कारवाई आणखीन तीव्र करण्यात येणार आहे. तरी गावातील आणि पर्यायाने सातगाव पठार भागातील नागरीकांनी मास्क वापरावेत, सोशल डिस्टंन्सचे पालन करावे, संचारबंदीचे पालन करावे, प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मंचर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे तसेच पेठ ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
आज करण्यात आलेल्या कारवाई मध्ये एस.एस.खबाले पोलीस उपनिरीक्षक,राजू कांबळे सहाय्यक फौजदार तसेच अनिल सणस उपसरपंच, अशोक राक्षे ग्रामपंचायत सदस्य, एम. जे. चौगुले ग्रामसेवक, सलीम तांबोळी क्लर्क शाहरुख पटेल आदी सहभागी झाले होते.