पाचगणी, (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाकिंदा, ता. महाबळेश्वर येथे मंजूर केलेल्या स्ट्रॅाबेरी संशोधन केंद्राचे काम सुरू झाले असून, यासाठी पहिल्या टप्प्यात 40 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील महत्त्वाचे पीक असलेल्या स्ट्रॅाबेरीवरील संशोधनासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना साकार होत आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय कृषी विकास योजना 2022-23 अंतर्गत या केंद्राला मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि महाबळेश्वर येथील गहू गेरवा संशोधन केंद्रांतर्गत राबविण्यात येणार आहे.
या प्रकल्पासाठी 343.63 लाख रुपयांचा निधी पाच वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या संचालकांनी (संशोधन) शासनास सादर केलेल्या प्रस्तावानुसार या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. केंद्राच्या इमारतीचा बांधकम खर्च दोन कोटी 31 लाख, स्ट्रॉबेरी लागवड आणि संशोधनासाठी 79 लाख आणि कृषी अवजारांसाठी 40 लाख रुपये खर्च येणार आहे.