मुंबई – भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिमन्यूसारखे चक्रव्युहात अडकवल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते तथा माजी मंत्री सुरेश नवले यांनी केला आहे. भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
सुरेश नवले एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, भाजपने खासदार भावना गवळी, हेमंत पाटील व कृपाल तुमाने यांचा बळी दिला आहे. भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात आहेत. ही शोभादायक गोष्ट नाही. शिवसैनिकाला न्याय मिळत नाही म्हणून हा उठाव झाला. सर्वजण एकनाथ शिंदेंसोबत बाहेर पडले आणि हे सरकार अस्तित्वात आले. पण आता खासदारांनाही आपली खासदारकी वाचवता आली नाही. मित्र पक्षाचे उमेदवार सांभाळण्याची व त्यांना पोसण्याची जबाबदारी शिवसेनेवर आल्याचे वाटत आहे.
नवले यांनी यावेळी महायुतीच्या जागावाटपावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, परभणीची जागा रासपला दिली. नाशिकची जागा शिवसेनेची आहे. पण ही जागाही राष्ट्रवादीला सोडल्याची मला खात्री आहे. आता रत्नागिरी-सिंधुदुर्गाची जागाही भाजपला सोडण्यात आली आहे. भाजप शिवसेनेचा बळी देऊन तिला संपवण्याचे कारस्थान करत आहे.
भाजप शिवसेना पक्ष चालवण्याचे दिग्दर्शन करत आहे. हा सिनेमा लोकसभेला चालेल का याचे उत्तर जनता देईल. पण आमच्या 40 आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आमच्या 13 खासदारांना उमेदवारी मिळवताना एवढा घाम फुटला, उद्या विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळवताना आपल्याला किती त्रास होईल, किती पराकाष्टा करावी लागेल याची चिंता त्यांना लाली आहे, असेही नवले यावेळी बोलताना म्हणाले.
आमच्यावर राजकीय जोहार
अंतर्गत सर्व्हे नकारात्मक असल्याचा दावा करत शिवसेनेच्या नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात येत आहे. जे आपले सर्वस्व पणाला लावून मुख्यमंत्र्यांसोबत आले त्यांच्या वाट्याला आता राजकीय जोहार आला आहे. मुख्यमंत्र्यांवर जागा बदलण्याचा दबाव कुणी टाकला. मुख्यमंत्री भाजपच्या दबावाला बळी पडले. ते या दबावाला एकाकी तोंड देत आहेत, कमी पडत आहेत. त्यांच्यावर सामूहिक दबाव टाकून जागा सोडवून घेतल्या जात आहेत, असा आरोपही नवले यांनी यावेळी केला.