नगर, (प्रतिनिधी) – आजी व नातवाचा खून करणार्या दोघांना येथील जिल्हा न्यायाधीश आर. एन. नाईकवाडे यांनी दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. नेकपालसिंग पोटीयासिंग चितोडीया (वय ६५), कमलसिंग उर्फ तोतासिंग उर्फ राकेश नेकपालसिंग चितोडीया (वय ३० दोघे मुळ रा. केशरनगर, जामनेर रस्ता, भुसावळ, ता. भुसावळ, जि. जळगाव) अशी शिक्षा झालेल्या आरोपींचे नावे आहेत. त्या दोघांनी कमलाबाई कागडियासिंग चितोडीया (वय ६५) व तिचा नातू सुनिलसिंग उर्फ टकलूसिंग बुटासिंग वितोडीया (वय १० दोघे रा. चितोडगड, राजस्थान) यांचा खून केला होता. सरकार पक्षातर्फे अति. सरकारी वकील अनिल डी. ढगे यांनी काम पाहिले.
शेवगाव शहरातील शेवगाव ते पाथर्डी रस्त्यावर ईतगाह मैदानावर अनोळखी अंदाजे ५५ ते ६० वर्ष वयाच्या महिलेला हत्याराने मानेसह डोके तोडून खून केला होता. तर डोके गायब करून पुरावा नष्ट केला होता. तसेच १२ ते १५ वर्ष वयाचा अनोळखी मुलाला टनक वस्तुने डोक्यात मारून त्याचाही खून केला होता. ही घटना २३ जानेवारी २०२१ रोजीचे रात्री दि. ११ ते २४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान घडली होती. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी हॉटेल मंगेशसमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता नेकपालसिंग पोटीयासिंग चितोडीया (वय ६५), कमलसिंग उर्फ तोतासिंग उर्फ राकेश नेकपालसिंग चितोडीया (वय ३० दोघे मुळ रा. केशरनगर, जामनेर रस्ता, भुसावळ, ता. भुसावळ, जि. जळगाव) या दोघांची नावे निष्पन्न झाली होती. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली होती. तपासादरम्यान मयत महिलेचे फेकून दिलेले मुंडके जप्त करण्यात आले होते. तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी आरोपींविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने एकुण १३ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये साक्षीदार, पंच, तपासी अधिकारी, डॉक्टर यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकार पक्षाचा आलेला पुरावा व युक्तीवादाच्या आधारे दोन्ही आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अति. सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी तपासी अधिकारी निरीक्षक पाटील यांची साक्ष नोंदविली. तसेच सदर खटल्यात पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार ए. बी. चव्हाण व ए. एन. बेळगे यांनी सहकार्य केले. सदर सत्र खटला चालविणेकामी जिल्हा सरकारी वकील सतिष पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.