मुंबई – राज्यात शिवसेनेतील बंडखोरीनंतर सत्तेत आलेल्या भाजपने आपला मोर्चा प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे वळविला असल्याचे मोहित कंबोज यांनी केलेल्या आजच्या ट्विटवरून दिसून येत आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचा बडा नेता जेलवारी करणार असल्याचे ट्विट करत मोहित कंबोज यांनी राज्यभरात खळबळ उडवून दिली. त्यांचे हे ट्विट अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दबाव तंत्र म्हणून आहे की त्या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे? असा सवालही आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रवादीच्या त्या बड्या नेत्याची देशात आणि परदेशात असलेली मालमत्ता, बेनामी कंपनी, खास मैत्रिणीच्या नावावर असलेली मालमत्ता, अनेक खात्यांच्या माध्यमातून केलेला घोटाळा, कौटुंबिक उत्पन्न या सगळ्यांबाबत हे सगळं उघडं करणार असल्याचा दावाही मोहित कंबोज यांनी केला आहे.
अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत, संजय पांडे यांच्या अटकेपूर्वी जसे ट्विट करत भाजपचे नेते किरीट सोमय्या सूचक इशारा द्यायचे. त्याच पद्धतीने आता मोहित कंबोज यांना कुणकुण लागलेली असते, असे यावरून समजते.
मोहित कंबोज यांच्या ट्विटचा संबंध हा भाजपच्या नुकत्याच झालेल्या कोअर टीमच्या बैठकीशी लावला जात आहे. या बैठकीला भाजपचे कोअर टीमचे सदस्य, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सर्व ज्येष्ठ नेते, मंत्री, मुंबईतील आमदार उपस्थित होते. दोन तास चाललेल्या भाजप कोअर टीमच्या बैठकीत त्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर कारवाई करण्यावर एकमत झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादीच्या त्या बड्या नेत्याने मोहित कंबोज यांच्याशी संबंधित काही खात्यांकडे माहिती मागवली. मग त्या माहितीसंदर्भात कोअर टीममध्ये चर्चा झाली असता राष्ट्रवादीच्या त्या बड्या नेत्याचा विषयच बैठकीत आला. मोहित कंबोज तसे भाजपचे वादग्रस्त नेते असून, नवाब मलिक, संजय राऊतांनीही त्यांच्याविरोधात आधी गंभीर आरोप केले होते.
फडणवीसांची मूक संमती?
काही वेळा मोहित कंबोज यांनी त्या दोघांना न्यायालयातही खेचले. संजय राऊत, नवाब मलिकांनंतर आता त्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला सोडायचं नाही, असाही त्या बैठकीला सर्व भाजप नेत्यांचा सूर निघाला. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनीच मोहित कंबोज यांना त्या राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात कारवाईसाठी मूक संमती दिल्याचे बोलले जात आहे.