सातगाव पठार परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात
पेठ- सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागातील अनेक शेतकऱ्यांनी नवरात्र उत्सवात चांगला बाजारभाव मिळेल या आशेने झेंडूची लागवड केली होती. त्यानंतर झालेल्या चांगल्या पावसामुळे झेंडूच्या फुलांची शेती बहरली होती. आकर्षक पिवळ्या धम्मक गोंड्यामुळे शेतकरी देखील सुखावला होता. परंतु, पितृपंधरवड्यात फुलांना बाजारभाव मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी फुलांची तोडणी करून तशीच शेताच्या बांधावर टाकून दिली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवादरम्यान झेंडू फुलांची विक्री करता येईल या अंदाजाने लावलेल्या झेंडुच्या रोपांना गणेशोत्सवानंतर फुलांचा बहर आला. मात्र, पितृपंधरवड्यात या फुलांना मागणी नसल्याने त्यांना बाजारभाव मिळाला नाही. परिणामी जी फुले तोडणीला आली होती त्याची शेतकऱ्यांनी तोडणी करून ती बाजारात विक्रीस पाठवण्याणऐवजी शेताच्या बांधावर तशीच टाकून दिली. त्यामुळे आता नवरात्र उत्सावात तरी उर्वरीत फुलांना चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
सातगाव पठार भागातील झेंडू फुलांचे मळे बहरल्याचे पाहावयास मिळत आहे. इतर पिकांपेक्षा या फुलांची तोडणी करणे सुलभ असते. त्यामुळे मजूर सहजरीत्या उपलब्ध होतात. नगदी पैसे मिळवून देणारे पीक असल्यामुळे फुलशेती करणे शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. नवी मुंबई व पुणे या दोन हक्काच्या बाजारपेठा फूल विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हवामान फूल शेतीसाठी अनुकूल आहे. मात्र, सध्या बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.