मुंबई – शेअर बाजार निर्देशांक तुलनेने उच्च पातळीवर असल्यामुळे बरेच गुंतवणूकदार विक्री करून नफा काढून घेत आहेत. सोमवारीही शेअर बाजार निर्देशांकांत त्यामुळे घट नोंदली गेली. माहिती तंत्रज्ञान कंपन्या, भांडवली वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्या आणि बॅंकांच्या शेअरचे सोमवारी मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 482 अंकांनी कमी होऊन 58,964 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 109 अंकांनी म्हणजे 0.62 टक्क्यांनी कमी होऊन 17,674 अंकांवर बंद झाला. लार्सन अँड टुब्रो, एचसीएल टेक्नॉलॉजी, इन्फोसिस, विप्रो, एशियन पेंट, एचडीएफसी बॅंक, ऍक्सिस बॅंक या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. तर आयसीआयसीआय बॅंक, एनटीपीसी, कोटक बॅंक, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. टीसीएस कंपनीची ताळेबंद बाजार बंद झाल्यानंतर जाहीर होणार होता.
शेअर बाजारातील कामकाजाबाबत बोलताना जीओज वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, युरोपियन रिझर्व बॅंकेची बैठक लवकरच होणार आहे, अमेरिकेच्या महागाईची आकडेवारी या आठवड्यात जाहीर होणार आहे, त्याचबरोबर या आठवड्यामध्ये भारतातील कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर होणार आहेत. या सर्व घटनाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे.
हागाईमुळे जागतिक शेअर बाजार निर्देशांक आणि फारसे वाढले नाहीत. अमेरिकेचे फेडरल रिझर्व या वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात व्याजदर वाढ करणार असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 575 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. दरम्यान भारताच्या दृष्टीकोनातून घडलेली सकारात्मक घडामोड म्हणजे आहेत कच्च्या तेलाचे दर कमी होऊन 100 डॉलरपेक्षा कमी झाले आहेत.