नवी दिल्ली – भारताची चालू खात्यावरील तूट वाढून रुपयाचे मूल्य वेगाने कमी होत असतानाच सरलेल्या आर्थिक वर्षात सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात वाढल्याची आकडेवारी आज जाहीर करण्यात आली.
2021-22 या वर्षात सोन्याची आयात 33 टक्क्यांनी वाढून 46 अब्ज डॉलरवर गेली आहे. अगोदरच्या वर्षांमध्ये सोन्याची आयात केवळ 34 अब्ज डॉलरची झाली होती. सोन्यासाठी भारताला बऱ्याच प्रमाणात डॉलर मोजावे लागले असल्यामुळे सरलेल्या वर्षांमध्ये भारताची चालू खात्यावरील तूट वाढून 192 अब्ज डॉलरवर गेली आहे. अगोदरच्या वर्षांमध्ये चालू खात्यावरील तूट केवळ 102 अब्ज डॉलर इतकी होती.
भारत जगात सर्वात जास्त सोने आयात करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. पहिल्या क्रमांकावर चीन हा देश आहे. भारताने आयात केलेल्या सोन्यापैकी काही सोने दागिने बनवून नंतर त्याची निर्यात केली जाते. चालू खात्यावरील तूट वाढू नये याकरिता केंद्र सरकार गेल्या दहा वर्षापासून सोन्याची आयात कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे.
त्यासाठी सोन्याच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात शुल्क लावण्यात आले आहे. त्याचबरोबर देशांतर्गत सोन्याचा फेरवापर करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. याशिवाय ग्राहकांना डिजिटल सोने खरेदी करण्याचा पर्याय केंद्र सरकारने उपलब्ध केलेला आहे.
मात्र असे असले तरी सोन्याची आयात वाढत आहे. रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर परकीय गंगाजळीवर परिणाम झाला आहे. हा परिणाम कमी करण्यासाठी निर्यात वाढवावी लागणार आहे, तर आयात कमी करावी लागणार आहे. त्यातल्या त्यात सोन्यासारख्या अनावश्यक बाबीची आयात कमी करण्यासाठी भारत सरकारला प्रयत्न करावे लागतील असे विश्लेषकांनी सांगितले.