लखनौ – कॉंग्रेस पक्षाने काल 20 लाख तरूणांना नोकऱ्याचे आश्वासन एका जाहीरनाम्याद्वारे दिल्यानंतर आता समाजवादी पक्षही या स्पर्धेत उतरला असून त्यांनी आयटी क्षेत्रात 22 लाख नोकऱ्यांचे आश्वासन दिले आहे. आज एका पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी हे आश्वासन दिले आहे.
ते म्हणाले की, आम्ही राज्यात सत्तेवर असताना राज्याला आयटी सेक्टर मध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता. चक गजरीया फार्म मध्ये एचसीएल कंपनीने गुंतवणूक करण्याचेही मान्य केले होते. त्या कामाला नंतरच्या काळात चालना दिली गेली असती तर आज उत्तरप्रदेश हे आयटी सेक्टरचे हब झाले असते असे ते म्हणाले.
एकट्या एचसीएल कॅम्पस मध्ये पाच हजार लोकांना थेट रोजगार मिळाला असता आणि हजारो जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळू शकला असता असे त्यांनी नमूद केले. दरम्यान यावेळी कॉंग्रेसचे माजी खासदार प्रविणसिंहू अरोन आणि त्यांच्या पत्नी सुप्रिया यांनी यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षात प्रवेश केला. सुप्रिया यांना कॉंग्रेसने बरेली कॅन्टोन्मेंट मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. पण त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला असून आता त्याच मतदार संघात त्या समाजवादी पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत.