Stock Market Holiday: अयोध्येत येत्या सोमवारी 22 जानेवारी रोजी भगवान श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. या दिवशी शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शेअर बाजारात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर शनिवार, 20 जानेवारी रोजी शेअर बाजारात दोन टप्प्यांत व्यवहार होतील. मिळालेल्या माहितीनुसार, शेअर बाजार नियामक सेबी, बीएसआय आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजने आपापसात चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने 22 जानेवारी हा दिवस राज्यात सुट्टी म्हणून घोषित केला आहे. त्यानंतर आरबीआयने म्हटले आहे की 22 जानेवारी रोजी प्राथमिक किंवा दुय्यम बाजारात सरकारी रोखे, विदेशी चलन, मनी मार्केट आणि रुपया व्याजदर डेरिव्हेटिव्हमध्ये कोणतेही व्यवहार किंवा सेटलमेंट होणार नाही. सर्व थकित व्यवहारांची पुर्तता आता 23 जानेवारी रोजी होईल.
यापूर्वी, वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागाने देखील सर्व सरकारी बँका आणि सरकारी विमा कंपन्यांना गुरुवारी, 18 जानेवारी 2024 रोजी पत्र लिहून त्यांची कार्यालये दुपारी 2.30 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था तसेच केंद्रीय औद्योगिक संस्था अर्धा दिवस म्हणजे दुपारपर्यंत बंद राहतील.
22 जानेवारी रोजी अयोध्येत राम लला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार असून तो देशभरात साजरा होणार असल्याचे केंद्र सरकारने परिपत्रक जारी केले. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही हा उत्सव साजरा करता यावा, यासाठी देशभरातील सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापना दुपारी अडीच वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानंतर आता शेअर बाजार नियामक SEBI ने देखील स्टॉक एक्सचेंज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून स्टॉक ट्रेडर्स 22 जानेवारी रोजी राम लला प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम पाहू शकतील आणि मोठ्या थाटामाटात साजरा करू शकतील. तर शनिवार, 20 जानेवारी रोजी शेअर बाजारात काही काळ दोन टप्प्यांत व्यवहार होईल.