अकरावी प्रवेशासाठी अजूनही धावपळ

पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत एटीकेटी सवलतधारक विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालात इयत्ता अकरावी प्रवेशासाठी धावपळ करावी लागत आहे. ऑनलाइन प्रवेशाची मुदत संपण्याच्या शेवटच्या दिवशीही बहुसंख्य विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदवता आलेला नाही. या विद्यार्थ्यांची पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातच गर्दी केल्याचे चित्र मिळाले.
पुणे विभागात अकरावीसाठी 296 कनिष्ठ महाविद्यालयात

1 लाख 4 हजार 139 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. प्रवेशासाठी तीन फेऱ्या व त्यानंतर विशेष फेरीही राबविण्यात आलेली आहे. प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावरील प्रवेश फेरी राबविण्यात आली आहे. या फेऱ्यानंतरही प्रवेशाच्या बऱ्याचशा जागा रिक्तच होत्या. नामांकित महाविद्यालयातील प्रवेशाच्या जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत.

मार्च व जुलै 2019 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत दोन विषय अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटीची सवलत देऊन इयत्ता अकरावीला प्रवेश देण्यात येतो. यासाठी 14 सप्टेंबरपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष जावून आपला प्रवेश ऑनलाइन निश्‍चित करण्यासाठी मंगळवारी (दि.17) दुपारी 1 वा.पर्यंतच मुदत देण्यात आली होती. यातील रिक्त जागांचा तपशीलही एक-दोन दिवसात जाहीर होणार आहे.

काही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रांकडे पाठविण्यात आले. प्रवेशासंबंधी अडचणी निर्माण झाल्यास ठिकठिकाणी मार्गदर्शन केंद्रे सुरू होती. यातील बहुसंख्य केंद्रे बंदच, तसेच काही केंद्रामधून विद्यार्थ्यांना व्यवस्थित माहितीच न दिल्यामुळे या विद्यार्थ्यांनी थेट विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात धाव घेत गर्दी केली. दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सर्व माहितीचा डेटा संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. मात्र, एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये शेवटच्या निकालानुसार बदल करावा लागतो. या बदला नंतरच विद्यार्थ्यांना ऑनलाइन महाविद्यालयाची एन्ट्री करता येणार आहे.

सुधारित वेळापत्रक जाहीर होणार
अकरावीसाठी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. यात कोणीही प्रवेशापासून वंचित राहणार नाही. रिक्त जागांचा आढावा घेऊन दोन दिवसांत सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रवेशाची पुढील कार्यवाही होणार आहे, अशी माहिती पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांनी दिली आहे. –

Leave A Reply

Your email address will not be published.