#व्हिडीओ : चालकाचा ताबा सुटून शिवशाही बसचा भीषण अपघात

प्रतिनिधी, खळद – शिवरी (ता.पुरंदर) येथे आज शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. शिवशाही चालकाचा ताबा सुटल्याने बसने एका हॉटेलला जोरदार धडक देत रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन थांबली. या अपघातात चालकासह दोन प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर सासवड येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

पुणे येथून आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बारामतीच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बस चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. यावेळी शिवशाही रस्त्याच्या पुर्णपणे विरुद्ध बाजूला येऊन येथील यमाई मातेच्या मंदिरालगतच्या हॉटेलला जोरदार धडक देत पुन्हा रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन थांबली. शिवशाहीच्या धडकेमुळे हॉटेलमधील सर्व साधनसामग्रीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच या हॉटेलमध्ये सकाळी नेहमीच चहा पिण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र सुदैवाने आज पाऊस असल्याने सर्व नागरिक मंदिराच्या विसावा मंडपात थांबल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, शिवशाही बसचे मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याने नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. एसटी महामंडळाचे अधिकारी पंचनाम्यासाठी आले असता नागरिकांनी त्यांच्यासमोर संताप व्यक्त केला. तसेच यावर नियंत्रण ठेवले नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी नागरिकांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)