नवी दिल्ली : लॉक डाउन अगोदर घर खरेदी करण्यासाठी हालचाली करीत असलेल्या हुतांश ग्राहकांनी आता घरखरेदी लांबणीवर टाकली आहे. कारण आगामी काळात घरांचे दर बरेच कमी होतील असे या ग्राहकांना वाटते. यासंदर्भात 99 एकर्स डॉट कॉम संस्थेने ग्राहकांच्या मनाचा अंदाज घेण्यासाठी सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातील माहितीनुसार 90 टक्के संभाव्य ग्राहकांना घरांचे दर कमी होतील असे वाटत असल्यामुळे त्यांनी घर खरेदी लांबणीवर टाकली आहे.
यातील 40 टक्के ग्राहकांनी घर खरेदी एक वर्षापेक्षा जास्त लांबणीवर टाकली आहे. तर 60 टक्के ग्राहकांना वाटते की पुढील बारा महिन्याच्या आत घर खरेदी केल्यानंतर ती किफायतशीर दरात पडेल. 56 टक्के ग्राहकांनी सांगितले की, सध्या सर्वच क्षेत्रात आणि अनिश्चितता असल्यामुळे अशा प्रकारचा मोठा निर्णय घेण्याची आवश्यकता नाही. तर 30 टक्के ग्राहकांनी सांगितले की, त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडेल असे त्यांना वाटत असल्यामुळे ते सध्या घर खरेदी करण्याचा विचार करीत नाहीत.
पुण्यासह दिल्ली, मुंबई, कलकत्ता, हैदराबाद, बंगलोर, चेन्नई, चंदीगड, अहमदाबाद, लखनऊ या शहरातील संभाव्य ग्राहकांशी चर्चा केल्यानंतर सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे. यावेळी या नागरिकांना मागणी कशी राहील, गुंतवणुकीची परिस्थिती कशी राहील, घरांचे दर कसे राहतील यासंदर्भात विचारणा करण्यात आली.
बऱ्याच विकसकांनी सध्याचे घरांचे दर हे अतिशय कमी पातळीवर आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात घर खरेदी करणे योग्य राहील असे सांगितले आहे. लॉक डाऊन नंतर काही काळ तरी घरांचे दर आणखी कमी होतील असे बहुतांश ग्राहकांना वाटते. गुंतवणुकीसाठी घर खरेदी करण्याबाबत विचारणा करण्यात आली असता 31 टक्के ग्राहकांनी सांगितले की घर खरेदी हा सध्या चांगला पर्याय आहे. 24 टक्के ग्राहकांनी मुदत ठेविला पसंती दर्शविली. तर 24 टक्के ग्राहकांनीच सोने खरेदीला पसंती दर्शवली. फक्त 21 टक्के ग्राहकांनी शेअर बाजारातील गुंतवणूक योग्य राहील असे म्हटले आहे.
तयार घरांना अधिक पसंती
तयार घर किंवा तयार होणारे घर यासंदर्भात ग्राहकांना विचारणा केली असता 85 टक्के ग्राहकांनी सांगितले की सध्याच्या परिस्थितीमध्ये तयार घर घेणे योग्य राहील. कारण तयार होणारे प्रकल्प योग्य काळात पूर्ण होतील की नाही याबद्दल अनिश्चित वातावरण आहे. सध्या बऱ्याच शहरांमध्ये तयार घरे बऱ्याच प्रमाणात पडून आहेत. त्यांच्या किमतीही कमी आहेत. याचबरोबर ग्राहक प्रत्यक्ष घर पाहण्याऐवजी या घराची जास्तीत जास्त माहिती डिजिटल माध्यमातून घेण्यास प्राधान्य देत आहेत. लॉकडाऊनमुळे ग्राहकांच्या मानसिकतेवर हा परिणाम झाला असल्याचे या अहवालात म्हटले आहे.