बोधिसत्व जनजागृती संघाच्या मागणीस सर्वपक्षीय पाठिंब्याचे पत्र
निवेदनावर 4 हजार 440 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या
देहूरोड – येथील ऐतिहासिक बुद्ध विहार परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, यासंदर्भात बोधिसत्व जनजागृती संघाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन दिले आहे. याशिवाय या मागणीसाठी देहूरोडमधील सामाजिक संस्था, संघटनांसह विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे.
यासंदर्भात बुद्ध विहार सुशोभीकरण करण्याबाबतचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अप्पर तहसीलदार गीता गायकवाड यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. या वेळी बोधिसत्व जनजागृती संघाच्या अध्यक्षा संगीता अशोक वाघमारे, उपाध्यक्ष परशुराम दोडमणी, संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक वाघमारे, संघाचे सदस्य गणेश जावळे, नीलम गौतम, विनोद जावळे आदी संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
याबाबत 4 हजार 440 स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षरीचे पत्र जोडण्यात आले आहे. याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे देहूरोड शहर अध्यक्ष ऍड. कृष्णा दाभोळे, भाजपचे बाळासाहेब शेलार, भरत नायडू, कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक चौगुले, मनसेचे जॉर्ज दास, परशुराम दोडमणी, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे अंकुश चव्हाण, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) दशरथ शेट्टी, मानव आधार सामाजिक संस्थेचे तेजस निकाळजे, दीपक निकाळजे, सामाजिक विकास संघटना तसेच बुद्ध विहार कृती समितीचे मुख्य ट्रस्टी के. एच. सूर्यवंशी यांनी बोधिसत्व जनजागृती संघाच्या वतीने ऐतिहासिक बुद्ध विहार सुशोभिकरणास पाठिंब्याचे पत्र दिले आहे.