राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा : दळवी व हळंगेडी विजेते

पुणे – जेश दळवी व सृष्टी हळंगेडी यांनी राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे पुरूष व महिलांच्या गटात अजिंक्‍यपद मिळविले. युबा मुलांच्या गटात शुभम आंब्रे याला हा मान मिळाला तर मुलींमध्ये अनन्या बसाकला विजेतेपद मिळाले. परभणी येथे महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पुरुष गटात दळवीने अश्‍विन सुब्रमण्यमवर 5-11,9-11, 7-11, 11-5,13-11, 11-6,11-9 असा विजय मिळविला. त्याआधी उपांत्य फेरीत सुब्रमण्यमने जिज्ञेश रहाटवालवर 4-3 अशा गेम्समध्ये मात केली होती. दळवीने आंब्रेचा 4-3 अशा गेम्समध्ये पराभव केला. आंब्रेने या गटातील पराभवाची कसर युवा गटाच्या विजेतेपद्वारे भरून काढली. त्याने अंतिम सामन्यात सुब्रमण्यमला 11-9, 10-12, 11-9, 11-2, 8-11, 11-9 असे पराभूत केले.

महिलांच्या उपांत्य फेरीत हळंगेडीने अनन्या बसाकला 4-1 अशा गेम्सने नमविले. दुसरा उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत सेनोहरा डीसुझाने श्‍वेता पारटेचा 4-2 असा पराभव केला. अंतिम सामन्यात हळंगेडीने डिसुझाला 11-13 , 11-9, 10-12, 11-9,11-9, 11-8 असे हरविले. युवा मुलींच्या गटात अनन्या बसाकने सुवर्णपदक मिळविताना दिशा हुलावळेचा 11-7, 12-10,11-3, 6-11, 12-10 असा पराभव केला. उपांत्य फेरीत हुलावळेने तेजल कांबळेला 3-2 गेम्सने पराभूत केले. अन्य उपांत्य फेरीत बसाकने विधी शहावर 3-1 गेम्सने विजय मिळविला.  बक्षीस वितरण सोहळा माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर, परभणी जिल्हाक्रीडाधिकारी कलीमोउद्दीन फारूखी, प्राचार्य डॉ. बाळासाहेब साहेब जाधव यांच्या हस्ते झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.