हडपसरचे दशरथ जाधव दुसऱ्यांदा ‘फूल आर्यनमॅन’

हडपसर – क्‍लेजेनफर्ट ऑस्ट्रिया येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत हडपसर येथील उद्योजक दशरथ जाधव यांनी पुन्हा एकदा “फूल आर्यनमॅन’ होण्याचा मान मिळविला आहे. अशाप्रकारची कामगिरी करणारे ते सर्वात वृद्ध भारतीय ठरले आहेत. गेल्यावर्षी जर्मनीत झालेल्या याच स्पर्धेमध्येही त्यांनी “फूल आर्यनमॅन’ होण्याचा बहुमान मिळविला होता.

“फूल आर्यनमॅन’ ही वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशन (डब्ल्यूटीसी)द्वारे आयोजित एक लांब-अंतर ट्रायथलॉन रेस आहे. या स्पर्धेमध्ये 3.8 किमी पोहणे, 180.2 किमी सायकल चालवणे आणि 42.20 किमी धावावे लागते. ही स्पर्धा याच क्रमाने आणि विश्रांतीशिवाय पूर्ण करावी लागते. जगातील सर्वात कठीण एक दिवसीय स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. स्पर्धकांच्या सहनशक्‍तीचा आणि ताकदीचा अंत पाहणारी म्हणून या स्पर्धेची ओळख आहे.

जाधव यांनी वयाच्या 62 व्या वर्षी ही स्पर्धा पूर्ण केली आहे. ही स्पर्धा सतरा तासांच्या निर्धारित वेळेत पूर्ण करायची होती. मात्र, जाधव यांनी 15 तास 23 मिनिटात ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. राज्यातील विविध भागांतून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

कौटुंबिक पाठिंबा, मित्रांचे प्रोत्साहन व सहकार्य, प्रशिक्षक कौस्तुभ राडकर यांच्याकडून होत असलेले मार्गदर्शन आणि सर्वात महत्त्वाची प्रयत्नपूर्वक जपलेली शारिरीक व मानसिक तंदुरुस्ती यामुळे हे शक्‍य होत आहे. नियमित सरावामुळे सलग पंधरा तास सहजपणे मी स्पर्धेत राहून “फूल आर्यनमॅन’ होऊ शकलो.

फ्रान्स येथील स्पर्धेतही घेणार सहभाग

18 ते 22 ऑगस्टला फ्रान्स येथे पॅरिस ब्रीस्ट पॅरिस ही 1,230 किलोमीटरची स्पर्धा होणार आहे. यामध्ये 65 देशांतून 6,000 स्पर्धक सहभागी होणार आहेत. हडपसर येथून दशरथ जाधव यांच्यासह डॉ. प्रकाश डुबे पाटील, डॉ. चंद्रकांत हरपळे, देविदास होले, मनोहर तनपुरे हे सहभागी होणार आहेत. अतिशय खडतर चढ उतार, खेडेगावातून जाणारे छोटे रस्ते, एकूण अकरा हजार मीटरचे लेव्हेशन व दिवस-रात्र प्रवास करत नव्वद तासांच्या आत हे अंतर पार करावे लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.