नीरा – गुळूंचे ते नीरा या पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी व याबाबत आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश व सूचना बारामतीचे उपविभागीय दंडाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग बारामतीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीबाबत नेहमीच डोळेझाक करणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचेही गुळुंचे येथील तरुणांनी सांगितले.
दरम्यान, प्रांताधिकारी यांच्या धडाकेबाज कारवाईचे याचिकाकर्ते, ग्रामस्थ, यात्रा कमिटी यांनी आभार मानले आहेत. या पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याची गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड दुरवस्था झालेली आहे. साईडपट्ट्या नावालाच शिल्लक असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. याबाबत बांधकाम विभागाकडे वारंवार अर्ज विनंत्या करूनही बांधकाम विभागाने याची दखल घेतली नाही, त्यामुळे व्यथित होऊन येथील नरवीर उमाजी नाईक सामाजिक विकास ट्रस्टचे अध्यक्ष संजय चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते नितीन निगडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 133 नुसार उपविभागीय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात नुकताच दावा दाखल केला होता.
याची तातडीने दखल घेत आता या रस्त्याची डागडुजी बांधकाम खात्याने सुरू केली आहे. यानुसार न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बांधकाम विभागाला दंडाधिकाऱ्यांकडून सूचना