सार्वजनिक बांधकाम विभागाला गांभीर्य नाही
राजेगाव – राजेगाव-दौंड मुख्य रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बसवण्यात आलेले मैलाचे दगड (कि.मी.स्टोन) रस्त्यावर आडवे झाले आहेत. प्रवास करीत असताना संबंधित गावचे नाव, त्या गावाचे अंतर, रस्त्याची हद्द इत्यादी बाबींची माहिती सांगणारे हे मैलाचे दगड रस्त्यावरच आडवे झाले असून काही ठिकाणांहून तर गायब झाले आहेत.
राजेगाव-दौंड रस्त्यावर बसविण्यात आलेले हे मैलाचे दगड एक-दोन वर्षांपूर्वीच बसविण्यात आले होते. सद्यःस्थितीत बऱ्याच दगडांची दूरवस्था झाली असून काही ठिकाणांहून हे दगड गायब झाले आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. रस्त्यांच्या सुरक्षिततेबाबत या विभागातील अधिकारी, कर्मचऱ्यांना किती गांभीर्य आहे, हेच यावरून स्पष्ट होते.
राजेगाव-दौंड रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली काटेरी झुडुपे, पडलेले मोठे खड्डे यामुळे वाहन चालक त्रस्त असताना आता कि.मी. अंतर दर्शविणारे मैलाचे दगड कोलमडून पडल्याने वाहन चालकांची दिशाभूल होत आहे. रस्त्यालगत कोलमडलेले कि.मी. दर्शविणारे दगड आणखी किती दिवस पडलेल्या अवस्थेत राहणार, निकृष्ट कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असे विविध प्रश्न निर्माण होत असून संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.