बारामती -करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करोना तपासणी प्रयोगशाळा तातडीने सुरू करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे अधिकाऱ्यांना दिल्या.
बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेची उभारणी तसेच रुई ग्रामीण रुग्णालयात करोना रुग्णांसाठी 50 खाटांच्या क्षमतेची करोना हेल्थ केअर सेंटरची तातडीने उभारणी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बारामतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर अधिकारी व पदाधिका-यांच्या बैठकीत अजित पवार यांनी शहर व तालुक्याचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना देखील यावेळी केल्या.
यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, गटनेते सचिन सातव, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, मुख्याधिकारी योगेश कडूसकर, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, नगरसेवक किरण गुजर, डॉ. सदानंद काळे, डॉ. मनोज खोमणे आदी उपस्थित होते.
शहरासह तालुक्यात गैरप्रकाराला आळा बसावा म्हणून स्वस्त धान्य दुकानचा आढावा घेण्याच्या सूचना तहसीलदारांना त्यांनी केल्या. ग्रामीण भागात फवारणी, जीवनाश्यक वस्तू, दूध, भाजीपाला, बाहेरुन आलेल्या लोकांची तपासणी, प्राथमिक आरोग्य केंद्र आढावा घेत सर्व खासगी डॉक्टरांनी या संकटसमयी दवाखाने सुरू ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.
धैर्य व सहनशीलतेचे केले कौतुक
बारामती शहरात भिलवाडा तसेच बारामती बारामती पॅटर्न राबविण्यात येत आहे. बारामतीकर त्याला प्रतिसाद देत आहे. त्यांचे धैर्य व सहनशीलता कौतुकास्पद आहे. करोनाची साखळी तुटेपर्यंत लॉकडाऊनला सहकार्य करा कोणीही घराबाहेर पडू नका, असे अवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
म्हाडातील “त्या’ दोघांचा अहवाल निगेटिव्ह
बारामती -म्हाडा कॉलनीतील करोना संक्रमित रुग्णाच्या मुलाचे व नातवाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे वैद्यकीय अधीक्षक सदानंद काळे यांनी सांगितले आहे. बारामतीकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. शहरातील म्हाडा कॉलनीतील एका औषध दुकानात कार्यरत कर्मचाऱ्याच्या 77 वर्षीय वडिलांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. या रुग्णाच्या संपर्कातील 16 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. सुरुवातीला 14 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले त्यानंतर शनिवारी (दि. 18) रुग्णाच्या मुलाचा व नातवाचा रिपोर्ट देखील निगेटिव्ह आला आहे. बारामती शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या सात इतकी झाल्यानंतर एका 77 वर्षीय रुग्णाचा यामध्ये मृत्यू झाला तर शहरातील पहिला ठरलेला रुग्ण रिक्षाचालक मात्र “करोना’मुक्त झाला आहे इतर पाच जणांची प्रकृतीत सुधारणा होत आहे.