नवी दिल्ली – करोनावरील प्रभावी औषध अद्याप मिळालेले नाही. करोना विषाणूच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी सध्या अनेक औषधांच्या चाचण्या सुरू आहेत. त्यामध्ये रेमडिसविरच्याही चाचण्या सुरू आहेत. अन्य औषधांपेक्षा रेमडिसविर हे या संदर्भातील सर्वात प्रभावी ठरण्यची शक्यता अधिक मानली जात आहे. अशावेळी अन्य व्याधींवरील प्रभावी औषधाचा उपयोग करोनाच्या विरोधात कसा करता येऊ शकेल, यासंदर्भातील या चाचण्या आहेत.
पाच वर्षांपूर्वी ईबोला विषाणूच प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडिसविरचा प्राथमिक पातळीवर वापर यशस्वी झाल होता. कोविड-19 चा फैलाव रोखण्यासाठी रेमडिसविरला बऱ्यापैकी यश आले असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
सध्या कोविड-19 च्या विरोधात 130 औषधांच्या चाचण्या सुरू आहेत. काहींमध्ये विषाणूला थांबविण्याची क्षमता असू शकते तर काहींमध्ये अवयवांचे नुकसान करणाऱ्या प्रमाणापेक्षा अधिक उद्दिपित रोगप्रतिकारक शक्तीचा प्रतिकार शांत करण्यास मदत करू शकण्याची क्षमता आहे, असे अमेरिकेतील स्वतंत्र आर्थिक थिंक टॅंक मिलकेन इन्स्टिट्यूटमधील तज्ञांनी सांगितले.
जर एखाद्या औषधाचा नव्या हेतूसाठी वापर केला जाऊ शकत असेल, तर ते औषध म्हणजे रेमडिसविर असू शकते, असे जम्मूस्थित सीएसआयआर, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इंटिग्रेटेड मेडिसीनचे संचालक राम विश्वकर्मा यांनीही सांगितले. रेमडिसविरमुळे मृत्यूदर कमी होत आहे. सध्या नवीन औषध तयार करण्या इतका वेळ नाही. नवीन औषधासाठी 5-10 वर्षे लागू शकतील. त्याऐवजी उपलब्ध असलेल्या औषधाच्या वैद्यकीय चाचण्या घेणे अधिक योग्य होईल, असेही त्यांनी सांगितले.
सध्या फॅविपिरेव्हिल या जपानमधील मंजूर औषधाच्याही वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत. त्यासाठी हैदराबादमधील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीकडून फॅविपिरेव्हिलची निर्मिती केली जात असल्याचे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक शेखर मांडे यांनी या महिन्यात सांगितले.
“सीएसआयआर’ कडून फेव्हीपिरव्हिल, रेमेडेव्हिविर आणि कोल्चिसिन नावाच्या औषधांची वैद्यकीय चाचण्या घेतल्या जात आहेत. कोल्चिसिन सामान्यत: संधिरोगाच्या उपचारांसाठी वापरली जाते, असे विश्वकर्मा यांनी सांगितले.