पाबळ -राजगुरूनगर ते पाबळ मार्गावरही पीएमपीएलएची बससेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत असून पाबळ ग्रामपंचायतीकडून हा प्रस्ताव पीएमपीएलएकडे लवकरच सादर करण्यात येणार असल्याची माहिती ग्राम पंचायत सदस्य सचिन वाबळे यांनी दिली.
पाबळ येथे येण्यासाठी शिक्रापूर, आळंदी व राजगुरूनगर असे तीन मार्ग आहेत. तीन महिन्यांपासून प्रवाशांची गैरसोय होत आहे. यापैकी शिक्रापूर व आळंदी मार्गावरून बससेवा अनेक गावांच्या प्रवाशांना उपयुक्त ठरली आहे. मात्र, पाबळ ते राजगुरूनगर मार्गावर अद्यापही प्रवासी सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.
यामुळेच मार्गावर बससेवा सुरू व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, पुणे मनपा ते व्हाया शिक्रापूर अशी बससेवा पाबळ ते शिक्रापूरदरम्यान पाबळच्या पूर्वभागातील दळणवळणाची सोय प्रवाशांना मिळत आहे. त्याच धर्तीवर भोसरी ते पाबळ ही सेवा राजगुरूनगर मार्गावर सुरू व्हावी, अशी मागणी होत आहे.
भोसरी- पाबळ मार्गावरील वाहक देवरे व चालक वायाळ यांनीही मागणीला दुजोरा दिला असून राजगुरूनगर मार्गावर बस सुरू करावी, अशी मागणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत हेमंत रत्नपारखी, मुकुट शिंदे या प्रवाशांनी या मार्गावर वर्तुळाकार बस सुरू झाल्यास मोठया प्रमाणात प्रवासी उपलब्ध होऊन पीएमपी-एलएच्या उत्पन्नात वाढ होईल, अशी माहिती दिली.