पुणे – किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणात राज्याच्या आरोग्य विभागाने रुबी हॉल क्लिनिकला गुरूवारी कारणेदाखवा नोटीस बजावली असून 24 तासांत त्याचा खुलासा मागवला आहे. महिलेची किडनी काढून ती इतरास प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया रुबी हॉलमध्ये झाली होती. कोल्हापूर येथील महिलेला एजंटाच्या माध्यमातून पुण्यात आणून पैशांचे अमिष दाखवून तिची किडनी अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आली. मात्र, त्यानंतर आर्थिक व्यवहार फिस्कटल्याने “मी पत्नी नव्हेच’, असा पवित्रा घेत त्या महिलेने पोलिसांत तक्रारअर्ज केला आहे. या विषयावर गदारोळ झाल्याने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने रुबी हॉल क्लिनिकला नोटीस पाठवली आहे.
रूबी क्लिनिकचे म्हणणे…
याबाबतचा खुलासा रुग्णालयाने तयार केला असून तो शुक्रवारी सकाळी पाठवण्यात येणार असल्याचे, रुग्णालयाच्या विधी सल्लागार ऍड. मंजुषा कुलकर्णी यांनी सांगितले. मुळात या अवयव प्रत्यारोपणात जी कागदपत्रे संबंधितांकडून सादर केली गेली ती बनावट असल्याची तपासणी करणारी यंत्रणा आम्ही नाही. तसेच, त्यामध्ये पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र, पासपोर्ट, रेशनिंगकार्डसह अनेक पुरावे सादर करण्यात आले होते. त्याची पडताळणीही अन्य समित्यांनी केली आहे. यामध्ये रुग्णालयाची काहीच भूमिका नसल्याचे ऍड. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.