पिंपरी – वाढती लोकसंख्या विचारात घेता नागरिकांना घराजवळ, जलद आणि मोफत उपचार पुरविणे महापालिकेचे कर्तव्य आहे. काळभोरनगर, मोहननगर, फुलेनगर, रामनगर, विद्यानगर, शंकरनगर, चिंचवड स्टेशन परिसरातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे या भागात जिजाऊ क्लिनिक अथवा आरोग्यवर्धिनी केंद्र उभारावेत, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर यांनी केली आहे.
याबाबत काळभोर यांनी महापालिकेच्या अ क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांना निवेदन दिले आहे. राज्य शासनाच्या सुचनेनुसार आठ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत 79 आरोग्यवर्धिनी केंद्र अथवा जिजाऊ क्लिनिक उभारण्यात येणार आहेत. तर महापालिकेच्या रूग्णालयात वैद्यकीय सेवा या दर्जेदार असल्यामुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरातील उपचारासाठी येणार्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
महापालिकेच्या मोठ्या रूग्णालयावरील ताण कमी
करण्यासाठी शहरात 8 ते 10 हजार लोकसंख्या असलेला भाग, झोपडपट्टी, दाट मनुष्यवस्ती, चाळी, 1 किलो मीटर अंतरावर महापालिका रुग्णालय, दवाखाना उपलब्ध नाही, अशा 25 ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र अथवा जिजाऊ क्लिनिक सुरू करण्याचे नियोजन केले आहे. याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 10 आणि 14 मधील काळभोरनगर, मोहननगर, फुलेनगर, रामनगर, विद्यानगर, शंकरनगर, चिंचवड स्टेशन परिसरातील नागरिकांसाठी जिजाऊ क्लिनिक अथवा आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करावे.