ॲड.सादीक शिलेदार
नेवासा – तालुक्याची लोकसंख्या, क्षेत्रफळ तसेच वाढती गरज लक्षात घेऊन नेवाशात स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरु करण्याची आग्रही मागणी नेवासा तालुका आम आदमी पार्टीच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्री, परिवहन मंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली असून त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यासंदर्भात नेवासा ‘आप’च्यावतीने मुख्यमंत्री तसेच परिवहन मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेल्या नेवासा तालुक्यात दोन मोठे सहकारी साखर कारखाने, बाजार समितीबरोबरच देशात ओळख असलेली श्री शनैश्वर देवस्थान (शनिशिंगणापूर), श्री संत ज्ञानेश्वर मंदीर, श्री मोहिनीराज मंदीर, श्री म्हाळसा खंडोबा मंदीर (नेवासा) तसेच श्री क्षेत्र देवगड, वरखेड, बहिरवाडी आदी धार्मिक स्थळांमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल वाढली असून त्यामाध्यमातून व्यावसायिक तसेच घरगुती वापराच्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे.
वाहनांशी संबंधित कामासाठी नेवासा तालुका श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन नियंत्रण कार्यालयाशी जोडलेला असल्याने येथील वाहनधारकांना त्यासाठी श्रीरामपूरला जावे लागते. नेवासा तालुक्यातील माका, पाचुंदा, तेलकुडगांव, देवसडे, चिलेखनवाडी आदी गावांतील लोकांना तब्बल 100 पेक्षा जास्त कि.मी.चा प्रवास करुन श्रीरामपूरला जावे लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. एवढे करुनही श्रीरामपूर आरटीओ कार्यालयावर कामकाजाचा मोठा भार असल्याने एका फेरीत काम होईल याची त्यांना शाश्वती नसल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे तालुक्यातील बहुतांश लोकांच्या वेळ, पैसा आणि श्रमाचा अपव्यय होत असल्याची बाब या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्याच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. श्रीरामपूर आरटीओ कार्यालयावर कामाचा मोठा भार असल्याने विहित मुदतीत त्यांच्याकडून लोकांची कामे होण्यास आपोआपच मर्यादा पडत असल्याचे या नमूद करुन मोठ्या प्रमाणावर कामे पेंडींग राहात असल्याने त्याचा वेगळाच मनःस्ताप लोकांना सहन करावा लागत असल्याची बाब यात ठळकपणे नमूद करण्यात आली आहे.
नेवासा तालुक्याची वाढती लोकसंख्या, मोठे क्षेत्रफळ तसेच गरज लक्षात घेऊन श्रीरामपूर आरटीओ कार्यालयावरील कामकाजाचा बोजा कमी करण्याच्या दृष्टीकोनातून नेवासा येथे स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरु केल्यास तालुक्यातील लोकांची सोय होऊन त्यांच्या वेळ, पैसा तसेच श्रमाची मोठ्या प्रमाणावर बचत होण्याबरोबरच परिवहन संबंधित कामकाज गतीमान होऊन शासनाच्या महसूलात मोठी भर पडणार असल्याचा विश्वास ‘आप’च्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.
निवेदनावर नेवासा ‘आप’चे तालुकाध्यक्ष राजु आघाव, निवडणूक समिती प्रमुख अॅड.सादिक शिलेदार,सचिव प्रवीण तिरोडकर, उपाध्यक्ष देवराम सरोदे, अण्णासाहेब लोंढे,भाऊसाहेब बेल्हेकर,बाळासाहेब साळवे,शहराध्यक्ष संदिप आलवणे, अल्पसंख्यांक आघाडीचे सलिम सय्यद, युवा आघाडीचे दीपक गायकवाड,आदींच्या सह्या असून यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
नेवासा तालुक्याचे क्षेत्र १३४३.४३ वर्ग कि.मी असून १२७ गावे आहेत.त्यामुळे नागरिकांना श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात जाणे जिकरीचे ठरत आहे.त्यामुळे आरटीओ कार्यालय लवकरात लवकर येथे न झाल्यास आम आदमी पक्षाच्यावतीने मोठे जनआंदोलन उभे करू.