अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार
पुणे – महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक दि. 13 डिसेंबर रोजी होणार असून, सकाळी
11 वाजता होणाऱ्या खास सभेत निवडणुकीद्वारे अध्यक्ष निवडले जाणार आहे. या पदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत आहे.
एका सदस्याकडे दोन पदे ठेवता येणार नाहीत, या भाजपच्या नियमानुसार स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे हे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी स्थायी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यापाठोपाठ महापौर, सभागृह नेतेही बदलण्यात आले.
भाजपतर्फे स्थायी समिती अध्यक्षपदासाठी हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने रासने हेच अध्यक्ष होणार हे निश्चित आहे. तरीही नियमानुसार ही निवडणूक घ्यावी लागणार आहे. निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएलच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांची विभागीय आयुक्तांनी नेमणूक केली आहे.
शिवसेना कोणासोबत?
राज्यात युती तुटल्याने महापालिकेतही त्याचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना कोणाची साथ देणार, ती राष्ट्रवादीबरोबर जाणार की, तटस्थ राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याच माध्यमातून भाजपला शिवसेनेची साथ सगळ्याच विषयांमध्ये मिळणार का, की विरोधाला सामोरे जावे लागणार हे देखील समजणार आहे.