तपासणीसाठी विशेष भरारी पथके नियुक्त ः महिनाअखेर येणार अहवाल
पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशाची विशेष भरारी पथकामार्फत तपासणी करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला अखेर मुहुर्त सापडला आहे. तपासणीसाठी पाच पथके सज्जही झाली आहेत. डिसेंबरअखेर या पथकाकडून तपासणी अहवाल सादर होणार आहे.
यंदाही अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीही स्थापन करण्यात आली होती. प्रवेश प्रक्रियेची तपासणी करण्याबाबत शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला दोन वेळा आदेश बजावण्यात आले होते. सुरुवातीला कार्यालयाने या आदेशाची गांभीर्याने दखलच घेतली नाही. काही जणांनी प्रवेशाबाबत आरडाओरड केली. त्यामुळे अखेर उशिरा का होईना, पण कार्यालयाला जाग आली आहे.
प्रवेशाची तपासणी विशेष भरारी पथकामार्फत करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिक्षण उपसंचालक, सहाय्यक शिक्षण संचालक, पर्यवेक्षिय अधिकारी, केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समिती सदस्य, झोन प्रमुख, सेवानिवृत्त प्राचार्य व उपप्राचार्य, प्राध्यापक आदींचा तपासणी पथकात समावेश करण्यात आलेला आहे. प्रत्येक पथकात पाच अधिकारी आहेत.
कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी या शाखांची कनिष्ठ महाविद्यालये आहेत. याची संख्या 297 एवढी आहे. फेरीनिहाय झालेले प्रवेश, रद्द केलेले प्रवेश, रिक्त राहिलेल्या प्रवेशाच्या शाखानिहाय जागा, व्यवस्थापन, अल्पसंख्याक या राखीव कोट्यातील प्रवेश, आरक्षणनिहाय झालेले प्रवेशासह इतर बाबींविषयी सविस्तर माहिती तपासणीद्वारे जमा करण्यात येणार आहे.
विशेष भरारी पथके कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी देणार आहे. त्या ठिकाणची प्रवेशाची कागदपत्रे कसून तपासणार आहेत. पथकाला प्रवेशाबाबतची कागदपत्रे उपलब्ध करुन द्यावीत. कोणतीही तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असा सूचना पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांनी अनुदानित, विनानुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिल्या आहेत.