Revanth Reddy – कॉंग्रेस पक्षाचा विजय झालेल्या तेलंगणा या राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी ( Chief Minister ) पक्षाचे नेते रेवंत रेड्डी ( Revanth Reddy ) यांच्या नावावर कॉंग्रेस श्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले असून येत्या ७ डिसेंबर रोजी त्यांचा शपथविधी होणार असल्याचे कॉंग्रेसच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार रेड्डी यांच्या शपथविधीची तयारी सुरू झाली असून त्यांच्यासोबत आणखी काही नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तेलंगण विधीमंडळ कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत नेता निवडीचाअंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षश्रेष्ठींना देण्यात आले होते.
आता यासंदर्भातही निर्णय घेतला गेला असल्याचे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मात्र राहुल यांनी कोणाचे नाव घेतले नाही. तथापि, दिल्लीत झालेल्या बैठकीला राहुल यांच्या व्यतिरिक्त कॉंग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे नेते के. सी. वेणुगोपाल यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
दरम्यान, कॉंग्रेसच्या तेलंगणा विजयात रेवंत रेड्डी यांचा मोठा वाटा असला आणि पक्षाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असली तरी त्यांच्या नावाला काही ज्येष्ठ नेत्यांकडून विरोध केला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रेड्डी यांचा काल सायंकाळी होणारा शपथविधी स्थगित करण्यात आला आणि नव्याने यावर चर्चा सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.
माजी प्रदेशाध्यक्ष एन. उत्तमकुमार रेड्डी, माजी विधीमंडळ नेते भट्टी विक्रमार्क, माजी मंत्री कोमाटीरेड्डी वेंकटरेड्डी आणि माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजनरसिंह यांचा रेवंत यांच्या नावाला विरोध आहे. रेवंत यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराची प्रलंबित प्रकरणे, तसेच त्यांच्या लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसची झालेली खराब कामगिरी आदी मुद्दे या नेत्यांनी उपस्थित केले आहेत.