वकील व नागरिकांची मोठी गैरसोय
हडपसर – हवेली क्रमांक 3 व 6 या दोन सहदुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाज गेल्या सहा दिवसांपासून बंद आहे, त्यामुळे दस्त नोंदणीचे कामकाज ठप्प झाले आहे. यातून शेकडो नागरिकांची गैरसोय होत आहे.
हडपसर येथील मगरपट्टा-मेघासेंटर येथील सहदुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 3 व लोणी काळभोर (कदमवाकवस्ती) येथील सहदुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 6 मध्ये नोंदणी अधिकारी उपलब्ध नसल्याने दस्त नोंदणीचे काम ठप्प झाले आहे. 31 डिसेंबरनंतर येथे अधिकारी उपलब्ध नसल्याने जमीन, प्लॉट, फ्लॅट व इतर स्थावर मालमत्ता व मिळकतीचे खरेदी व विक्री दस्त नोंदणी बंद राहिली आहे.
या दोन्ही कार्यालयात एरवी दस्त नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू असते. या कार्यालयातून शासनाला वार्षिक कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. या कार्यालयात पुणे जिल्ह्यासह देशभरातील नागरिक जमीन खरेदी-विक्री तसेच टाऊनशिप मधील फ्लॅट दस्त नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. परंतु, ही कार्यालये सध्या बंद असल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
याठिकाणी कामकाज करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नाहीत. कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत यासाठी पत्रव्यवहार केला असून कर्मचारी उपलब्ध होताच या कार्यालयातील दस्त नोंदणीचे कामकाज सुरू होईल.
– अनिल पारखे, सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी
हवेली क्रमांक 6 येथे कधीही कायम स्वरुपी अधिकारी नसतात. अनेकदा प्रभारी अधिकारी कामकाज पाहतात. त्यामुळे येथे कायमस्वरूपी अधिकारी द्यावेत. याशिवाय मेगा सेंटर येथील हवेली क्रमांक 3 हे कार्यालय दोन सत्रात सुरू करण्यात यावे.
– ऍड. चेतन प्रभाकर शेवाळे, माजी उपाध्यक्ष -पुणे बार असोसिएशन
उपाध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस लीगल सेल
हडपसर व लोणीतील दोन्हीही निबंधक कार्यालय बंद असल्याने नागरिकांना हवेलीतील दुसऱ्या कार्यालयात जाऊन दस्त नोंदणी करावी लागत आहे. त्यामुळे याभागातील नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून ही कार्यालये सक्षम अधिकारी देऊन सुरू करावीत.
– ऍड. अमित काळभोर