नवी दिल्ली – देशात करोना विरोधी लसीला आपत्कालिन वापरासाठी मंजूरी दिल्यापासून 10 दिवसात लस उपलब्ध करून देण्याची तयारी करण्यात आली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. लसीला 3 जानेवारीला आपत्कालिन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे, मात्र लस उपलब्ध करून देण्याबाबतचा अंतिम निर्णय सरकारकडे असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
आरोग्य सेवा कर्मचारी आणि आघाडीच्या कामगारांनी स्वत: ची नोंदणी करणे आवश्यक नाही. त्यांची माहिती को-विन लस वितरण व्यवस्थापन प्रणालीवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला आहे, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. “ड्राय रन’च्या प्रतिक्रियांद्वारे उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे आरोग्य मंत्रालय कोविड-19 विरोधी लसीला आपत्कालिन वापराची परवानगी दिल्यापासून 10 दिवसात लॉंच करण्याच्या तयारीत आहे. मात्र अंतिम निर्णय सरकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ऑक्सफोर्ड ऍस्ट्राझेनेकाच्या “कोविशील्ड’ आणि भारत बायोटेकच्या “कोवॅक्सिन’ या स्वदेशी लसीच्या आपत्कालिन वापराला रविवारी मंजूरी देण्यात आली आहे. भारतात आणि जगभरात लस वितरणासाठी को-विन ही यंत्रणा तयार करण्यात आली आहे.
या यंत्रणेतून प्रत्येकासाठी आरोग्य- आयडी तयार केला जाईल. या यंत्रणेतून व्यक्तींचा क्रमांक, आधार प्रमाणीकरण देखील केले जाऊ शकणार आहे. लसीकरणाच्या प्रक्रियेतील गैरव्यवहार टाळण्यासाठी ही यंत्रणा उपयोगी ठरणार आहे. ज्या देशांना या लसी हव्या असतील, त्यांना भारताकडून या यंत्रणेच्या माध्यमातून मदत केली जाईला असेही भूषण यांनी सांगितले.
देशातील करोनाच्या स्थितीमध्ये सुधारणा होत असून मृत्यूदरामध्ये घट होत आहे, असे निती आयोगाचे आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी सांगितले. ब्रिटनच्या नवीन विषाणूच्या संसर्गानंतरही रुग्ण संख्येत घट होणे असेच सुरू राहिल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.