नगर – अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी बाळ बोठे याच्यावतीने आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार बोठे याच्यावतीने अॅड. जाधव यांनी हा अर्ज दाखल केला आहे.
तथापि, त्या अर्जावरील स्कुटिनी अद्याप झालेली नसल्याने अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर सुनावणीची तारीख निश्चित झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या 30 नोव्हेंबरला नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. ती हत्या सुपारी देवून केल्याचे स्पष्ट झाले असून, त्यात बोठे मुख्य संशयित सूत्रधार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी 2 डिसेंबरला दिली होती. तथापि, तत्पूर्वीच बोठे पसार झाल्याने पोलिसांसमोरील अडचणी वाढलेल्या आहेत.
बोठे याच्या विरोधात पोलिसांनी स्टँडिंग वॉरंटसाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे. त्यावर काल (ता.4) आदेश होण्याची शक्यता होती. तथापि, न्यायालयाने त्यावरील आदेश राखून ठेवलेला आहे. पुढील दोन दिवसांत त्यावर आदेश होऊ शकेल, अशी माहिती तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली होती.