मुंबई – राष्ट्रवादी काॅंग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील सर्व 115 जणांनांही जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी जामीन मिळावा यासाठी सदावर्तेंनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, अकोल्याच्या अकोट न्यायालयाकडूनही अॅड. गुणरत्न सदावर्तेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी चप्पल फेक केली होती. यानंतर राज्यभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या घटनेच्या विरोधात राष्ट्रवादीकडून राज्यभर आंदोलन करण्यात आले. हल्ल्यासाठी वकील गुणरत्न सदावर्ते जबाबदार असल्याचा ठपका त्यांच्यावर आहे.
सदावर्ते यांनी 7 एप्रिल रोजी चिथावणीखोर भाषण केले होते. त्यात त्यांनी शरद पवार यांना टार्गेट करत 12 तारखेला आम्ही बारामतीत येऊ, घरी राहून दाखवा, असं आव्हान सदावर्ते यांनी पवारांना दिले होते. सदावर्ते यांनी आझाद मैदानात आधी जल्लोष करून नंतर कर्मचाऱ्यांची माथी भडकवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच सरकारी कामात अडथळा आणणे आणि परवानगी शिवाय इतरांच्या घराच्या परिसरात घुसखोरी करण्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान त्यांना अटक झाली होती. आज त्यांना या हल्ल्याप्रकरणी जामीन मंजूर झाला आहे.