पिंपरी – राज्य शासनामध्ये विलनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ज्येष्ठ नागरिक आणि इतर सवलतधारकांना देण्यात येणाऱ्या स्मार्ट कार्डच्या नोंदणी आणि वितरण प्रक्रियेलाही त्याचा फटका बसला होता.
मात्र स्मार्ट कार्डचे वितरण पुन्हा सुरू करण्यात आले असून ज्येष्ठ नागरिकांना 1 जूनपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. स्मार्ट कार्ड नसेल तर सवलतीच्या दरात प्रवास करता येणार नसल्याचे एसटीकडून जाहीर करण्यात आले आहे.
एसटी बसमधून अल्पदरात प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना आता पास ऐवजी महामंडळाकडून आधार क्रमांकाशी संलग्न असलेले अत्याधुनिक स्मार्ट कार्ड दिले जात आहे.
काय कागदपत्रे आवश्यक असतात?
आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिक असल्याचा दाखला सोबत आणणे आवश्यक आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या अंगठ्याचा ठसा स्कॅनरवर घेतला जाईल.
आधारकार्डाशी संलग्न माहिती प्राप्त झाल्यावर नावनोंदणी केली जाईल.
प्रवास करताना या कार्डाशिवाय इतर कोणतीही कागदपत्रे दाखविण्याची गरज भासणार नाही.