कोलोंबो – श्रीलंकेने आपल्या सागरी हद्दीतून अवैधपणे होणारी आण्विक आणि किरणोत्सारी पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी अमेरिकेबरोबर एक सागरी सुरक्षा करार केला आहे. श्रीलंकेच्या नौदलाने नौदल मुख्यालयामध्ये यूएस नॅशनल न्युक्लिअर सिक्युरीटी ऍडमिनिस्ट्रेशनबरोबर नुकताच एक सामंजस्य करारावर स्वाक्षर्या केल्या.
या सामंजस्य करारावर श्रीलंकेतील अमेरिकेच्या राजदूत ज्युली चुंग आणि श्रीलंकेच्या नौदलाचे कमांडर व्हाईस ऍडमिरल प्रियंथा परेरा यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. या सामंजस्य कराराने तांत्रिक सहकार्याद्वारे विशेष अणु सामग्री आणि इतर किरणोत्सर्गी सामग्रीची बेकायदेशीर तस्करी शोधण्यासाठी आणि रोखण्यासाठी द्विपक्षीय सहकार्य केले जाणार आहे.
यामध्ये श्रीलंकेच्या सीमा क्रॉसिंग कंट्रोल पॉईंट्सवर अशा सामग्रीचा शोध आणि ओळख करण्यासाठी तांत्रिक प्रणाली प्रस्थापित करण्याचा समावेश आहे. भारत आणि श्रीलंकेच्या सागरी हद्दीतील सुरक्षा आणि चाचेगिरीला आळा घालण्याच्या उपाय योजनांसाठी भारतीय नौदलाची मदत आतापर्यंत घेतली जात होती.