Lok Sabha Election 2024 – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करायचा नाही, असा निर्धार करत माढा लोकसभामधील महायुतीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. दरम्यान, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने भाजपमधील गटबाजी उफाळून आली आहे.
सोलापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय कोकाटे यांनी अधिक माहिती दिली. कोकाटे म्हणाले, आम्ही ज्या राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे, संजय शिंदे यांच्या विरोधात आजवर राजकारण केले. त्यांच्या बाजूने राजकारण करा, अशी भूमिका पक्ष नेतृत्वाची असल्यास ती आम्ही मान्य करणार नाही. भाजपचे राजकारण हे भ्रष्ट प्रवृत्तीला खत पाणी घालणारे आहे.
माढा, करमाळाचे आमदार शिंदे आणि त्यांच्या पिलावळीच्या भ्रष्टाचाराला केवळ अभय दिले असे नव्हे तर खतपाणीही घातले जात आहे. लाखो रुपयांची दलाली घेऊन त्यांना साखर कारखाने विकत दिले. भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आपल्या विरोधात काम केले. आता आम्हीही या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात काम करणार आहोत.
आरक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध जातींमध्ये भांडण लावली जात आहेत. महिला विधेयकामध्येही महिलांची फसवणूकच झाली आहे अशा पक्षाचा आम्ही का म्हणून प्रचार करायचा? असा सवालही त्यांनी केला.
भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची आगामी काळात युती राहणार आहे. आम्ही मात्र भाजपच्या उमेदवारा विरोधात काम करण्याचा निर्धार केला असल्याने संभ्रम नको म्हणून पक्षाचे पद आणि पक्ष त्याग करण्याचा निर्णय घेत असल्याचे कोकाटे म्हणाले.