कोलंबो – श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये समुद्रात एक नवीन शहर उभारण्यात येत आहे. “कोलंबो पोर्ट सिटी’ असे त्याचं नाव असून श्रीलंकेसाठी ते आर्थिकदृष्ट्या चित्र पालटणारे मानले जात आहे.
कोलंबोच्या व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या भागामध्ये वाळूच्या माध्यमातून शहराचा विस्तार करून एक हायटेक शहर तयार केले जात आहे. या माध्यमातून आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र, निवासी भाग आणि मरिना याची निर्मिती करून दुबई, मोनॅको आणि हॉंगकॉंगच्या धर्तीवर हे शहर तयार केले जात आहे.
कोलंबो पोर्ट सिटी इकॉनॉमिक कमिशनचे सदस्य सलिया विक्रमसूर्या म्हणाले, या माध्यमातून श्रीलंकेला पुन्हा एकदा जागतिक स्तरावर अस्तित्व सिद्ध करता येणार आहे. जागतिक दर्जाचे शहर तयार करून त्याद्वारे दुबई आणि सिंगापूर यांच्याशी स्पर्धा करण्याची संधी मिळेल.
या प्रकल्पासाठी चीनची हार्बर इंजिनीअरिंग कंपनी 1.4 अब्ज डॉलरची गुंतवणूक करत आहे. त्याच्या मोबदल्यात या कंपनीला 43 टक्के भूभाग 99 वर्षांच्या भाडेतत्वावर (लीज) दिला जाईल. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अंदाजे 25 वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दक्षिण आशियातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे.