Asia Cup 2023 Super Four Pakistan vs Sri Lanka :आशिया कपच्या सुपर-4 फेरीत श्रीलंकेने पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव केला. यासह श्रीलंकेच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली.
पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 42 षटकांत 7 बाद 252 धावा केल्या. डकवर्थ लुईस नियमानुसार श्रीलंकेसमोर 42 षटकांत 252 धावांचे लक्ष्य होते आणि श्रीलंकेने आठ गडी गमावून शेवटच्या चेंडूवर हे लक्ष्य गाठले.
श्रीलंकेकडून फलंदाजीत कुसल मेंडिसने सर्वाधिक 91 धावा केल्या. असालंकाने नाबाद 49 धावा करत संघाला विजयापर्यंत नेले. समरविक्रमानेही 48 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून गोलंदाजीत इफ्तिखार अहमदने तीन आणि शाहीन आफ्रिदीने दोन गडी बाद केले. शादाब खानला एक विकेट मिळाली.
तत्पूर्वी, पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 42 षटकांत 7 गडी गमावून 252 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून फलंदाजीत मोहम्मद रिझवानने सर्वाधिक नाबाद 86 धावा केल्या. त्याचवेळी इफ्तिखार अहमदने 47 धावांचे योगदान देत रिझवानसोबत शतकी भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. अब्दुल्ला शफीकनेही 52 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून गोलंदाजीत मथिशा पाथिरानाने तीन आणि प्रमोद मदुशनने दोन गडी बाद केले. तिक्ष्णा आणि वेळलगे यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
आता याच मैदानावर 17 सप्टेंबरला आशिया चषकाचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. याआधी टीम इंडिया 15 सप्टेंबरला बांगलादेशसोबत खेळणार आहे. मात्र, या सामन्याचा स्पर्धेवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण, सुपर फोरमधील पहिले दोन सामने गमावून बांगलादेशचा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला असून भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकून आधीच अंतिम फेरी गाठली आहे.