पुणे – दहशत पसरवून मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आकाश सुरेश पवार (रा.वडारवाडी) व दानिश रईस इनामदार (रा.जनवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी भुपेंद्र अशोक धोत्रे (36, रा.वडारवाडी) यांनी फिर्याद दिली.
फिर्यादी हे गोखलेनगर येथे बिर्याणी घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी एक दुचाकीस्वार गाडी घसरुन पडल्याने ते त्याला उचलत होते. यावेळी त्यांच्या तोंडओळखीच्या आरोपींनी तेथे येऊन त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर वीटा मारुन डाव्या हाताचे बोट फ्रॅक्चर करून दुखापत केली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण करत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत जुने वाद असलेल्या व्यक्तीबरोबर का फिरतो, म्हणून एकावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना डेक्कन येथील खिलारेवाडी येथे घडली. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी अभित भाट (34, वारजे), अतुल शेलार (35, कोथरुड), विजय कानगुडे (36, रा. खिलारेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी साजिद मेहमुद शेख (36, रा. रविवार) हा त्याच्या घरी जात असताना आरोपींनी त्याला अडवले. “तु योगेश तापकिरला का भेटतो’ असा सवाल करत त्याच्या हातावर चाकूने वार करत मारहाण केली. यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मेटे करत आहेत.