पुणे – अंमलीपदार्थ विक्री करणाऱ्या टोळीला खंडणी व अंमली पदार्थविरोधी पथकाने (पश्चिम विभाग) जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून 130 किलो गांजासह 24 लाख 53 हजारांचा ऐवज हस्तगत केला.
अरुण बळीराम जाधव (26, रा. निगडी), प्रशांत हरीभाऊ शिंदे (निगडी), शुभम सुनील मोहिते (19, रा. पांगरी, खेड) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातील गाडीत पाच गोण्यांमधून 130 किलो 250 ग्रॅम गांजा, रोख रक्कम सापडली.
आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सह आयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी शहर अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी मार्गदर्शनपर सूचना दिल्या आहेत. त्यानुसार उपायुक्त संभाजी कदम व सह आयुक्त डॉ.शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थविरोधी पथक गस्त घालत होते.
यावेळी पोलीस कर्मचारी प्रमोद गाडे यांना एका कारमध्ये गांजा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शास्त्रीनगर चौकात सापळा रचण्यात आला. संशयीत गाडी दिसताच तिला थांबण्याचा इशारा देऊनही ती थांबली नाही. यामुळे संशय आल्याने संबंधीत गाडी येरवडा येथील डॉन बॉस्को शाळेच्या रस्त्यावर अडवली. यावेळी गाडीतील तिघांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता गाडीत गांज्यांची पोती सापडली.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस उपनिरीक्षक निलेश महाडिक, दत्ताजी मोहिते, पोलीस कर्मचारी प्रदीप गाडे, रमेश गरुड, मंगेश पवार, सुनील चिखले, विजय गुरव, महेश कदम, साहिल शेख, मनोज शिंदे, फिरोज बागवान, प्रमोद टिळेकर, प्रदीप शितोळे, प्रविण पडवळ, रुपाली कर्णवर, मोहन येलपले यांच्या पथकाने केली.