पुणे – स्पोर्टसफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित दुसऱ्या स्पोर्टसफिल्ड मान्सुन लीग अजिंक्यपद 14 वर्षाखालील 30-30 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत स्पोर्टीव्ह क्रिकेट अकादमीने तिसरा विजय तर, फल्लाह क्रिकेट अकादमी संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून दुसऱ्या विजयासह आगेकूच केली.
सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस् क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात अर्णव लटपाटे याच्या 99 धावांच्या खेळीमुळे स्पोर्टीव्ह क्रिकेट अकादमीने स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकचा 152 धावांनी सहज पराभव करून तिसरा विजय मिळवला. स्पोर्टीव्ह क्रिकेट अकादमीने 30 षटकामध्ये 217 धावांचा डोंगर उभा केला. अर्णव लटपाटे याने 95 चेंडूमध्ये 16 चौकारासह 95 धावांची खेळी केली. सश्रीक दत्ता याने 50 धावांची खेळी केली. या धावसंख्येसमोर स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिकचा डाव 65 धावांवर गडगडला. अधिराज देशमुख याने 4 गडी टिपले. आयुष धरमाळे याने तीन तर, पार्थ पांडे याने दोन गडी बाद करून संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.
अजय यादव याच्या शतकी खेळीमुळे फल्लाह क्रिकेट अकादमीने स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लिनिक संघाचा 86 धावांनी पराभव करून दुसऱ्या विजयाची नोंद केली. फल्लाह क्रिकेट अकादमीने पहिल्यांदा फलंदाजी करताना 158 धावांचे आव्हान उभे केले. अजय यादव याने 92 चेंडूत 11 चौकार आणि 6 षटकारांसह 105 धावांची खेळी केली व संघाचा डाव एकहाती सावरला. या आव्हानासमोर स्पार्क स्पोर्टीव्ह क्रिकेट अकादमीचा डाव 72 धावांवर गडगडला. श्रेयस वाघमोडे, तनय खिंवसरा आणि अर्थव ठाकूर यांनी अचूक गोलंदाजी करत संघाला सहज मिळवून दिला.