पुणे – महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यामाने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला खो-खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, मुकूंदनगर येथील मैदानावर होणार आहे. स्पर्धेमध्ये देशातील विविध राज्यांतील १६ विद्यापीठांचे महिला संघ आणि २४० महिला खेळाडू सहभागी होणार आहेत.
ही स्पर्धा १५ ते १८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये दिवस-रात्र सत्रांमध्ये होणार आहे. या स्पर्धेव्दारेसुद्धा महिलांच्या पारंपारिक क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देऊन समाजामध्ये खो-खो क्रिडाप्रकाराचा प्रचार आणि प्रसाराचा उद्धेश आहे. पुर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण विभाग (झोन) अशा ४ विभांगातील अव्वल १६ संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत. यामध्ये उत्तर झोनमधून लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, रोहतकची महर्षी दयानंद युनिव्हर्सिटी, चंदीगढची पंजाब युनिव्हर्सिटी, कुरूक्षेत्र युनिव्हर्सिटी; दक्षिण झोनमधून युनिव्हर्सिटी ऑफ म्हैसुर, कॅलिकट युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ केरळ, भारतीय युनिव्हर्सिटी; पश्चिम झोनमधून पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, वीर नर्मदा साऊथ गुजरात युनिव्हर्सिटी; पुर्व झोनमधून फकीर मोहन युनिव्हर्सिटी, उत्कल युनिव्हर्सिटी, बुरडवान युनिव्हर्सिटी, हेमचंद यादव विश्वविद्यालय असे १६ संघ सहभागी होणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना करंडक देण्यात येणार आहेत. या शिवाय सर्वोत्कृष्ट संरक्षक, सर्वोत्कृष्ट आक्रमक आणि सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत..