पुणे – बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व पुणे जिल्हा बुद्बिबळ सर्कल(पीडीसीसी) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या १३ व्या स्वर्गीय प्रो. वामनराव आलुरकर मेमोरियल रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत सातव्या फेरीअखेर भुवन शितोळे, प्रथमेश शेरला यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
प्रभात रोड येथील सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सातव्या फेरीत अ (१००० ते १२४९ रेटेड खेळाडू) गटात भुवन शितोळेने युग बर्दियाला बरोबरीत रोखले व ६ गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. तर, वेदांत काळेने (५.५ गुण) दुसरा आणि अभिजय वाळवेकर (५.५ गुण) याने तिसरा क्रमांक पटकवला. ब (१२५० आणि त्यावरील रेटेड खेळाडू) गटात प्रथमेश शेरलाने किरण पंडितरावचा ६ गुणांसह विजेतेपद पटकावले.
तर, नमित चव्हाण (५.५ गुण) याने दुसरा क्रमांक आणि आर्यन सिंगला (५.५ गुण) याने तिसरा क्रमांक पटकावला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण अविनाश आलुरकर, बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे व चंद्रकांत मोकाशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चीफ आरबीटर आयए विनिता श्रोत्री आदी उपस्थित होते.