क्रिकेट काॅर्नर : अवांतर धावांची खिरापत थांबणार का ?

– अमित डोंगरे

भारतीय संघातील खेळाडू हे अत्यंत अनप्रेडीक्‍टेबल असल्याचे का बोलले जाते याचा पुरावा श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यांतून पुन्हा एकदा दिसून आला. या सामन्यात आपल्या गोलंदाजांनी अतिरिक्‍त धावांची खिरापतच श्रीलंकेच्या फलंदाजांना वाटली. खरेतर भारताचे आधीचे गोलंदाज फारसे नोबॉल टाकताना दिसायचे नाहीत. मात्र, श्रीलंकेत सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत ज्या अतिरिक्‍त धावा बहाल केल्या गेल्या त्या कधी थांबणार, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

भारताचे माजी कर्णधार व महान गोलंदाज कपिल देव यांनी कधी सराव सत्रातही नोबॉल टाकले नाहीत इतका त्यांचा स्टार्ट व लॅंडिंग अचूक असायचे. जेव्हा काही सामन्यांत भारतीय गोलंदाजांना सातत्याने नोबॉल टाकताना पाहिले गेले तेव्हा त्यांनी सांगितले होते की, बाजारहाट करताना हिंडता तसा स्टार्ट घेऊ नका, एकवेळ रिटर्ट क्रिझच्या मागून गोलंदाजी टाका पण पॉपिंग क्रिझ ओलांडू नका.

मात्र, त्यांचा हा सल्ला जवागल श्रीनाथ वगळता अन्य कोणी फारसा मनावर घेतल्याचे त्यावेळीही कधी दिसले नाही. वेगवान गोलंदाज नोबॉल टाकतात हे समजू शकते पण फिरकी गोलंदाज नोबॉल टाकताना पाहिले की आश्‍चर्य वाटते. यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव किंवा रवींद्र जडेजासारखे गोलंदाज केवळ चार ते पाच पावलांची स्टार्ट घेतात मग तरीही ते नोबॉल टाकतात याचाच अर्थ ते गोलंदाजी करताना अत्यंत कॅज्युअल ऍप्रोच ठेवतात हे उघड आहे.

श्रीलंकेत खेळत असलेल्या भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार याने तब्बल सहा वर्षांनंतर नोबॉल टाकला. आजच्या घडीला जागतिक क्रिकेटमध्ये अत्यंत अचूक स्टार्ट व लॅंडिंग असलेला हा गोलंदाजही जेव्हा अशा अतिरिक्‍त धावा देतो तेव्हा त्यावर सराव सत्रात नेटाने मेहनत घेतली गेली पाहिजे असेच जाणवते. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भुवनेश्‍वरने पाच वाइड चेंडूही टाकले. हार्दिक पंड्याने एक नोबॉल, यजुवेंद्र चहलने 3 तर दीपक चहरने 2 वाइड चेंडू टाकले. कुलदीप यादव व कृणाल पंड्या यांनी एकेक वाइड चेंडू टाकला. म्हणजेच एकूण 12 वाइड व एक नोबॉल असे 13 चेंडू जास्त टाकले गेले व एकूण अवांतर धावा 15 दिल्या गेल्या.

दुसरा सामनाही अपवाद ठरला नाही. त्यात हार्दिक पंड्याने 7 वाइड चेंडू टाकले. चहरने 3 वाइड चेंडू दिले. भुवनेश्‍वरने 1 वाइड तर, एक नोबॉल टाकला. चहल व कृणालने प्रत्येकी एक चेंडू वाइड टाकला. या सामन्यात एकूण 21 अवांतर धावा आपण श्रीलंकेला बहाल केल्या. ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची कामगिरी म्हणता येणार नाही. कित्येक सामन्यांचा अनुभव असलेल्या गोलंदाजांकडून अशा चुका अपेक्षित नसतात.

पुढील काळात अशा चुका होऊ नयेत यासाठी सराव सत्रात कसून मेहनत घेतली गेली पाहिजे. आगामी मोसमात विविध मालिकांसह टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धाही होणार आहे त्यामुळे त्यापूर्वी कामगिरीत एक पाऊल पुढे राहिले पाहिजे, रिटर्न किंवा पॉपिंग क्रिझच्या पुढे हेच पाऊल पडले तर पुन्हा धावांची खिरावत वाटली जाईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.