Tokyo Olympics | नेत्रदीपक सोहळ्याने रंगणार स्पर्धा

"ऑड इअर' स्पर्धेसाठी केवळ निमंत्रितांचीच उपस्थिती

टोकियो – ऑलिम्पिक स्पर्धांच्या इतिहासातील सर्वात निराळी स्पर्धा असे टोकियो ऑलिम्पिकचे वर्णन भविष्यात केले जाईल. करोनाच्या धोक्‍यामुळे क्रीडारसिकांच्या अनुपस्थितीत ही स्पर्धा होत आहे. शुक्रवारी

स्पर्धेचे उद्‌घाटन मोजक्‍या निमंत्रितांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. या स्पर्धेला ऑड इअर स्पर्धा असेही संबोधले जात आहे. कारण ही स्पर्धा इतिहासात प्रथमच विषम वर्षात होत आहे. उद्‌घाटन सोहळ्याला विविध देशांच्या ठराविक प्रतिनिधींनाच परवानगी देण्यात आली असून भारताचे केवळ सहा अधिकारी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

करोनाचा धोका अद्याप कायम असल्यामुळे जपानमध्ये आणीबाणी लावण्यात आली असल्याने क्रीडाशौकिनांना या स्पर्धेचे सामने आपापल्या घरातच पाहावे लागणार आहेत. भारताचे 127 खेळाडूंसह एकूण 228 जणांचे पथक जपानमध्ये असले तरी सोहळ्याला भारताचा एकही खेळाडू उपस्थित राहणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

स्पर्धेची वैशिष्ट्ये!

 • 1964 सालानंतर पुन्हा एकदा जपानमध्ये रंगणार स्पर्धा
 • विषम वर्षातील पहिलीची स्पर्धा
 • आजवरच्या सर्व स्पर्धा सम वर्षात झाल्या
 • दान करण्यात आलेल्या सोने, चांदी व तांब्यातून घडली पदके
 • खेळाडू व आयोजकांना रोबोट्‌सची मदत
 • कराटे, स्पोर्टस, क्‍लायबिंग, सर्फिंग आणि स्केट बोर्डिंगचा प्रथमच समावेश
 • महिलांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत प्रथमच पाच गट
 • पुरुष गटात 10 ऐवजी 8 गट
 • फ्री स्टाइल बीएमएक्‍स, मेडिसन सायकलिंग, 3 बाय 3 बास्केटबॉल स्पर्धा
 • टेबल टेनिसमध्ये मिश्र दुहेरी आणि ज़्युदोमध्ये मिश्र गट
 • 2008 सालानंतर बेसबॉल आणि सॉफ्टबॉलला पुन्हा स्थान
 • एकूण 33 क्रीडा प्रकारात होणार 339 स्पर्धा

भारताची मोहीम उद्यापासून

या स्पर्धेतील फुटबॉल व सॉफ्टबॉल क्रीडा प्रकारातील स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. तसेच उद्यापासून विविध क्रीडा प्रकारांतील मुख्य फेरीसाठीच्या पात्रता सामन्यांनाही प्रारंभ होणार आहे. मात्र, प्रत्यक्ष स्पर्धेतील भारताच्या मोहिमेला शनिवारपासून प्रारंभ होत आहे. तिरंदाजी, नेमबाजी तसेच मुष्टियुद्ध यांसह विविध क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे तमाम क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. अनुभवींसह नवोदित खेळाडूंकडूनही भारताला पदकाची अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.