कुरकुंभमध्ये श्री फिरंगाई क्रीडा महोत्सव सुरू
कुरकुंभ (वार्ताहर) – कुरकुंभ हे औद्योगिक वसाहत असल्याने या ठिकाणी विविध मोठ्या कंपन्या आहेत.कंपन्याचा आणि गावाचा समन्वय साधत कपन्यांनी त्यांचा सीएसआर ग्रामपंचायतीच्या वतीने गावासाठी खर्च करावा.आजकालची मुलांमध्ये मैदानी खेळ कमी झाल्याने पबजीसारख्या खेळाकडी वळले आहेत. यामुळे मागील काही दिवसांत तरुणांमध्ये मानसिक आजार वाढले आहेत. असे प्रकार होऊ नयेत यासाठी अल्काईलसारख्या कंपन्यांनी येथील ग्रामस्थांशी, ग्रामपंचायतीशी समन्वय साधत गावातील लोकांसाठी फुटबॉलचे मैदान किंवा वाचनालय सुरू करावे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले.
कुरकुंभ (ता. दौंड) येथे अल्काईल अमाइन्स केमिकल लि. आणि श्री फिरंगाईमाता माध्यमिक विद्यालयाच्या वतीने श्री फिरंगाई क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी महाडिक बोलत होते.
महोत्सवाचे हे सहावे वर्ष आहे. पहिल्या दिवशी दौंड तालुक्यातील साधारण 100 विद्यार्थी संघ या महोत्सवात सहभागी झाले आहेत.
या क्रीडा महोत्सवामध्ये खो-खो, कब्बडी, रस्सीखेच, गोळाफेक, भालाफेक अशा विविध खेळांचा समावेश आहे.
यावेळी दौंडचे तहसीलदार संजय पाटील, पोलीस पाटील रेश्मा शितोळे, सरपंच राहुल भोसले, माजी सरपंच रशिद मुलाणी, माजी उपसरपंच अरुण भागवत, दौंड गटशिक्षणाधिकारी नवनाथ वणवे, पोलीस निरीक्षक सुनील महाडीक, कुरकुंभ पोलीस उपनिरीक्षक तेजस मोहिते, अल्काईलचे मॅनेजर राजेश कावळे, उत्कर्ष शिक्षण संस्थेचे सचिव कचरदास उदावंत, संचालक रंगनाथ शितोळे, दौंड क्रीडा तालुका अध्यक्ष आवरी, सर्व संघाचे क्रीडा शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
श्री फिरंगाईमाता माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी भौतिक सुविधा अपूर्ण आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी परिसरातील कंपन्यांनी सहकार्य करावे. विद्यालयात विविध तालुका, जिल्हा, विभागीय, राज्यस्तरीय स्पर्धा होत असतात, यासाठी ग्रामस्थांचे नेहमीच सहकार्य लाभते.
– नानासाहेब भापकर, प्राचार्य, कुरकुंभ