आमदार कुल यांनी मंत्री गडकरी यांच्याकडून घेतला शब्द
देऊळगावराजे (ता. दौंड) -पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाशी निगडित विविध प्रकारच्या समस्या आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत तसेच दौंड तालुक्यातील विविध कामांसंदर्भात दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
प्रामुख्याने पुणे-सोलापूर महामार्गावरील भांडगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर भुयारी मार्ग आणि दौंड तालुक्याच्या विविध गावांच्या हद्दीतून जाणाऱ्या अनेक ठिकाणी प्रलंबित असलेल्या सेवा रस्त्या बाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास पुढील कार्यवाहीच्या सूचना मंत्री गडकरी यांनी याआधी केल्या आहेत.
केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत दौंड तालुक्यातील आलेगाव, मलठण, खानोटा, शिरापूर, स्वामी चिंचोली, या गावच्या रस्त्याच्या कामासाठी निधी मिळावा तसेच भीमा नदीवर गार ते अहमदनगर यांना जोडणाऱ्या मोठ्या पूलाला मंजूरी द्यावी. कारण या मार्गावर परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, यांची मोठी सोय होऊन विकास कामाला मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेस आपोआपच चालना मिळेल आणि कृषी मालाची देवाणघेवाण होण्यास मदत होईल याची संपूर्ण माहिती गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. होणारे अपघात लक्षात घेता या ठिकाणी महामार्गावरील मुख्य जंक्शन हे ओव्हर ब्रिज असणे गरजेचे बनले आहे. या कामांसाठी नितीन गडकरी यांनी आश्वासन दिल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.