आळंदी – गेली दोन वर्षे करोनामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला; मात्र यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव होत असल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. मूर्तीकार गणेशमूर्तीला आकार देत आहेत. आळंदीतील भोसले आर्टस येथेही गणेशमूर्तीला आकार देण्याचे काम सुरु आहे. मूर्ती बनवून तयार झाल्या असून त्यांना रंगरंगोटी करणे सुरू आहे.
30 वर्षांपासून गणेशमूर्ती बनवणारे मूर्तीकार बाळासाहेब पोपट भोसले यांनी सांगितले की, यावर्षी मूर्तींची संख्या वाढवण्यात आली आहे. गेल्या वर्षी पीओपीच्या 1500 आणि शाडू मातीच्या 600 मूर्ती बनवण्यात आल्या होत्या; मात्र यावर्षी मूर्तींची संख्या वाढवण्यात आली असून पीओपीच्या 2000 आणि शाडू मातीच्या 300 मूर्ती बनवण्यात येत आहेत. आळंदीसह परिसरातील नागरिकांचा खरेदीसाठी चांगला प्रतिसाद असतो. व्यवसाय म्हणून नाही तर कला म्हणून मी हे काम करतो.
आठ महिन्यांपासून तयारी
भोसले यांनी सांगितले की, डिसेंबर महिन्यापासून आम्ही गणेशमूर्ती बनविण्याचे काम सुरु करतो. पत्नी, दोन मुले आणि इतर आठ जण असे 12 जण आम्ही मूर्ती बनवण्याचे काम करतो. मूर्ती बनवण्याची शाडू माती ही गुजरातवरून पुण्यात येते. तेथून आम्ही घेतो.
शाडू मूर्तींची संख्या कमी
शाडू मातीच्या मूर्तीची किंमत ही पीओपी मूर्तीच्या तुलनेत जास्त असते. पीओपीची मूर्ती 1500 रूपयाला असेल तर त्याच उंचीची शाडू मातीची मूर्ती ही 3500 रुपयाला असते. 50 किलो शाडू माती 1500 रुपयांना तर 50 किलो पीओपी पावडर 500 रुपयांना मिळते. त्यामुळे शाडू मूर्तीची किंमत वाढते.