गतिरोधक ठरतोय जीवघेणा

शिक्रापुरात वाहनचालक वैतागले : प्रशासन कुचकामी

शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पुणे- नगर महामार्गावर मलठण फाटा परिसरात असलेला गतिरोधक जीवघेणा ठरत आहे. याठिकाणी दररोज अनेक अपघात होत असल्यामुळे हा जीवघेणा गतिरोधक हटविण्याची मागणी नागरिक करीत आहे.

शिक्रापूर येथील पुणे- नगर महामार्गावरील मलठण फाटा परिसरात असलेल्या साई सहारा पेट्रोलपंपासमोर काही दिवसांपूर्वी व्यावसायिकांनी रस्त्यावरील दुभाजक तोडून रस्ता तयार केला होता. त्यांनतर काही दिवसांनी गतिरोधक बसविले. परंतु येथे मोठा उतार असल्यामुळे वाहने वेगाने येतात.

गतिरोधक दर्शविणारा फलक नसल्यामुळे वाहनचालकांना दुभाजकाचा अंदाज येत नाही. दुभाजक दिसताच वाहने थांबवावी लागत आहे. त्यामुळे वेगाने येणारी वाहने ब्रेक दाबल्यामुळे रस्त्यावर थांबवावी लागत आहेत. त्यामुळे पाठीमागून येणारी इतर वाहने पुढे थांबलेल्या इतर वाहनांवर आदळत आहेत. यामध्ये अनेक अपघात होत आहेत.
काही दिवसांपूर्वी काही वाहने दुभाजकामुळे उलटली असल्याचे प्रकार घडले आहे. त्यामुळे गतिरोधक हटविण्यात यावेत, अशी मागणी उद्योजक गणेश सातकर यांनी केली आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गतिरोधक हटवून त्या ठिकाणी विद्युत ब्लिंकर बसविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करणार आहे.

बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नवनाथ शेळके म्हणाले की, नगर महामार्गावर असलेल्या गतिरोधक हटविण्याबाबत त्याठिकाणी जाऊन पाहणी करून गतिरोधक हटविण्यात येतील.

Leave A Reply

Your email address will not be published.