मुंबई : तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी खळबळजनक विधान केलं. स्टॅलिन यांच्या विधानानंतर देशाभरात विविध राजकीय पक्षांनी यावर आक्षेप घेतला. सनातन धर्मावरील टीकेवरून आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निशाणा साधला आहे.
सनातन धर्माविरोधी बोलणं आणि स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजणं, यापेक्षा मोठा मूर्खपणा नाही, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.
सनातन धर्मावर बोलणाऱ्यांनी इतर धर्माविषयी बोलून दाखवावं. इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मावर काही बोललं तर मोठा गोंधळ निर्माण होतो. सनातन धर्मावर बोलणाऱ्यांना लोक त्यांची जागा दाखवतील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सनातन धर्मावर होणाऱ्या टीकेबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सनातन धर्म किंवा सनातन संस्कृती ही भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. या देशात कुणीही कुणाच्या धर्मावर बोललं नाही पाहिजे. पण तुम्ही इतर धर्मावर बोलून दाखवा.
इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मावर बोललात तर मोठा गोंधळ निर्माण होतो. पण सनातन धर्माविरोधात अशाप्रकारे बोलणं आणि स्वत:ला धर्मनिरपेक्ष माननं, यापेक्षा मोठा मूर्खपणा दुसरा कोणताही नाही. पण त्यांना लोक त्यांची जागा दाखवून देतील. सनातन कधीही संपणार नाही. पण सनातनविरोधी ज्यांचे विचार आहेत, त्यांचे विचार नक्की संपुष्टात येतील.”असेही त्यांनी यावेळी म्हटले.