मुंबई – ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर करण्यात आला आहे. तर संजय शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, राज्यभरातील ठाकरे गटाचे नेते आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान या सर्व आरोपांवर शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे.
अंधारेंबद्दल एकही शब्द “अश्लील’ बोलल्याचा दाखवा, मी तत्काळ राजीनामा देतो, अशी भूमिका शिरसाट यांनी मांडली आहे.
माझ्यासाठी सत्ता महत्वाची नाही. मी चुकीचे काहीही बोललो असल्याचे सिद्ध केल्यास मी लगेच माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी तयार असल्याचे शिरसाट म्हणाले. तर महिलेचा अपमान झाला असल्याचे म्हटले जात आहे. पण जर महिला आहे तर महिलेसारखे बोलले पाहिजे.
गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना शिव्या दिल्या, अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना देखील शिव्या दिल्या. आमच्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन अशाप्रकारे शिव्या देण्याचे कंत्राट यांना कोणी दिले आहे. याच सुषमा अंधारे या हिंदू देवतांना बद्दल काय बोलल्या, मराठा समाजा बद्दल काय बोलल्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल यापूर्वी वाट्टेल ते बोलल्या असून, त्यांना हा अधिकार कोणी दिला आहे असा प्रश्नही शिरसाट यांनी विचारला.
आमदारकी उडत गेली…
दरम्यान माझ्या विरोधात आंदोलन करण्यात आले. माझ्याविरोधात आंदोलन करण्यासाठी आज मातोश्रीवरून फोन गेला. तेव्हा ठाकरे गटाच्या महिला आंदोलनासाठी आल्या होत्या. माझा विरोध आंदोलन करून केला, पण राजकारणात समोरा समोर लढले पाहिजे. तुम्हाला लढायचे तर समोर या, माझ्याबद्दल मी काहीही खपवून घेणार नाही. जशास तसे उत्तर देणार असून, गेली उडत ती आमदारकी अशा शब्दात शिरसाट यांनी आपल्यावरील आरोपाला उत्तर दिले.